सांस्कृतिक, धार्मिक कामे
पारनाका गणेश मंदिर जीर्णोद्धार
जुन्या आणि ऐतिहासिक कल्याण गावाची ओळख आणि इतिहासाचे साक्षीदार असलेल्या काही प्रमुख ठिकाणांपैकी एक असलेला पारनाका हा कल्याणकरांसाठी कायम जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. या पाराला ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारसाही लाभलेला आहे. याठिकाणी असलेला पार आणि त्याखाली असणारे श्री.गणरायाचे मंदिर हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. मात्र, काळाच्या ओघात जिर्णावस्थेत गेलेल्या मंदिराचे जतन करणे आवश्यक होते. स्थानिकांनीही त्यासाठी आपल्याकडे तशी विनंती केली होती. या विनंतीनुसार, सर्वांचे संकट हरण करणाऱ्या या अधिपतींच्या मंदिराचा जीर्णोद्धार तसेच त्याशेजारील परिसराचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी तब्बल 1 कोटी रूपयांचा भरीव निधी शासनाकडून उपलब्ध करून घेतला आणि त्यातून आज अतिशय सुंदर असे मंदिर आणि परिसराचे निर्माण काम होऊ शकले. ही देखील त्या गणेशाचीच कृपादृष्टी. कारण आपण केवळ निमित्तमात्र, ‘सर्व कर्ता करविता, तर शेवटी तोच!
माघी गणेशोत्सव
सलग गेल्या ३० वर्षापासून कल्याण पश्चिममध्ये शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी नवसाला पावणाऱ्या गणरायाचा माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावेळी आकर्षित धार्मिक वास्तू तसेच देखावे उभारून समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यावर भर दिला जातो. या काळात भजन, किर्तन, अथर्वशीर्षपठन यांसारख्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच विविध समाजपयोगी कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी सुंदर अशी शोभा यात्रा काढून सामाजिक बांधिलकी जपत भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप दिला जातो. हा माघी गणेशोत्सव ठाणे जिल्ह्यात अव्वल मानला जातो.
किल्ले दुर्गाडी नवरात्रौत्सव
संपुर्ण कल्याण नगरीचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रौत्सव हा येथील नागरिकांचा प्रिय उत्सव आहे. याच अनुषंगाने शिवसेनेतर्फे दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या किल्ले दुर्गाडी येथील नवरात्रौत्सवामध्ये केवळ कल्याणच नव्हे तर आसपासच्या परिसरातील लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. या कल्याण नगरीतील सर्वात मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्याची आणि दुर्गाडी देवीची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली. सुरूवातीला शिवसेना कल्याण शहरप्रमुख म्हणून आणि आता आमदार म्हणून ही परंपरा आणि आपला धार्मिक वसा आजही कायम राखला आहे. आणि यापुढेही तो असाच कायम राहील.
भगवा तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सव
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आपली कल्याण भूमी पावन झाली आहे. त्यांचे व त्यांच्या पराक्रमाचे स्मरण ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अभिनव असा ‘दिपोत्सव’ उपक्रम कल्याणमध्ये पहिल्यांदाच राबवण्यात आला. भगवा तलाव येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक परिसरात हजारो दिवे प्रज्वलित करून अनोख्या पद्धतीने छ्त्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.यावेळी दिव्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची १० बाय १० फूटांची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली होती.
श्रीराम मंदिर प्रतिकृतीची उभारणी
तब्बल 500 वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर साकारले गेले. मात्र, अनेकांना अयोध्येसा हे मंदिर पाहायला जाणे शक्य नसल्याने माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रभू श्रीराम मंदिराची अतिभव्य अशी प्रतिकृती साकारली होती. ही प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. गेल्या 30 वर्षांपासून अखंडपणे हा माघी गणेशोत्सव आपण साजरा करत आहोत. ज्याला परिसरातील हजारो भक्त भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतात.
कै. प्रल्हाद शिंदे स्मारकाचे नुतनीकरण
महाराष्ट्राचे लोकगायक, स्वरसम्राट कै. प्रल्हाद शिंदे यांच्या स्मारकाचे नुतनीकरण करण्याचे भाग्य आपल्याला लाभले. या लोक गायकाने आपल्या पहाडी आवाजाच्या शब्दांतून उभ्या महाराष्ट्राला विठ्ठलाचे दर्शन घडवले. अशा या लोकगायकाचे स्मारकही त्याच्या कीर्तीला साजेल असे हवे. नेमका हाच विचार डोळ्यासमोर ठेऊन आपण या स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले असून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे आणि पुढील कामही आता लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यात येईल. तत्पूर्वी आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात या लोकगायकासाठी आपण स्वतःहून पुढाकर घेत स्मारकासाठी जागाही उपलब्ध करून दिली. इतक्या मोठ्या व्यक्तीचे स्मारक आपल्या मतदारसंघात करण्याचे भाग्य आपल्याला लाभले यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो.
दादर येथील चैत्यभूमीची प्रतिकृती
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे आंबेडकरी अनुयायांच्या मनामध्ये दादर येथील चैत्यभूमीचे वेगळे स्थान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखो आंबेडकरी अनुयायी 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येत असतात. याच धर्तीवर आपल्या मतदारसंघामध्येही दादर येथील चैत्यभूमीची प्रतिकृती साकारली होती. याठिकाणीही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली होती. तसेच यंदा प्रथमच कल्याण पश्चिम येथील कै. आत्माराम भोईर चौकातून या अनुयायांनी CALNDLE MARCH काढून बाबासाहेबांना अभिवादन केले.
बुध्दीबळ स्पर्धा, कबड्डी, क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन
आपल्या मतदारसंघातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि त्यांच्यातील खेळाडूला वाव देण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी एक म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या धर्तीवर झालेली राष्ट्रीय बुद्धीबळ चषक स्पर्धा. सलग दोन वर्षे आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये कल्याणातील शेकडो उदयोन्मुख खेळाडूंनी सहभाग घेतला आणि आपल्यातील कौशल्याची चुणूक दाखवली. या बुद्धीबळ स्पर्धेसोबतच कबड्डी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा अशा विविध खेळांचे आयोजनही करण्यात आले होते.